मी
एक शेतकरी कुटुंबातून आलो आहे.त्याचा मला अभिमानही आहे.प्रत्येक शेतकरी आपल्या
शेतातल्या सर्व पिंकाची योग्य तो भाव मिळेल कि नाही हि चिंता मनात ठेवत अगदी
पोटच्या गोळ्याप्रमाणे काळजी घेतो.त्यांना वेळोवेळी खतपाणी घालत असतो.पण ठराविक
शेतकरी मात्र आपल्या शेताच्या बांधावरील आंब्याच्या सावटाखाली आपले पिक वाढत नाही
म्हणून त्या आंब्याची छाटणी किंवा कत्तल करतात.पण आपल्या सर्वाना पुढचे एक कटू
सत्य विसरून चालणार नाही.ते म्हणजे,
शेतातले मुख्य पिक खात्रीशीर आर्थिक आधार शेतकऱ्याला देऊन जाईल याची खात्री नसतांना
शेताच्या बांधावर वर्षातून एकदाच बहरणारा आंबा उन्हाळ्याची लाही कमी करत पावसाची
वाट पाहत बसलेल्या परिवाराला चटणी भाकरीसाठी हातभार लाऊन जातो हे मात्र नक्की.
शेतकऱ्याचा मुलगा म्हणून माझा वर्ग देखील मला एक शेतच
वाटतो.आणि या शेतातले मुख्य पिक म्हणजे हुशार...!!विद्यार्थी आणि उरलेली सर्व
आंब्याची झाडे..!!माझ्या परिचयातील काही शिक्षकांना आपण वर्गातील प्रत्येक मुलाला
वाचन लेखन आले पाहिजे या हट्टापाई हुशार मुलांवर अन्याय करतो असे वाटते.मग
बांधावरच्या आंब्याची कत्तल करणाऱ्या शेतकऱ्यात आणि आपल्यात फरक काय ? नगदी किंवा
हमखास उत्त्पन्न देणारी पिके लावणारी तर भरपूर मंडळी असतात.त्यांना खतपाणी घालयाला
भरपूर जण आहेत(आपण स्वतः, पालक, खाजगी शाळा-क्लासेस,विविध प्रकारचे गाईड्स इ.) मग बांधावरच्या
आंबा,पेरू,सीताफळ,चिक्कू पपई या सर्वांचे काय?
तेंव्हा आपण निश्चय करूया,
आपली शाळा फळबाग बनवूया.
आपल्यातलाच एक
श्री.राकेश
भटू बेडसे (प्राथ.शिक्षक)
No comments:
Post a Comment